लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळणार का? खगोलतज्ज्ञ म्हणाले, पृथ्वीपासून ते...

कल्पेश गोरडे| ठाणे : पृथ्वीवर येऊन आदळण्याची शक्यता असल्याचे वृत्त सर्वत्र धडकले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र या लघुग्रहापासून पृथ्वीला काहीही धोका नसल्याचे खगोल अभ्यासक यांनी सांगितले. नागरिकांनी भीती बाळगण्याचे किंवा चिंता करण्याचे काहीच कारण नाही, असेही ते म्हणाले. १९०८ मध्ये रशियातील तुंगस्का परिसरात ६० मीटर व्यासाची अशनी पृथ्वीवर आदळली होती. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिको युकातान प्रदेशात १० किलोमीटर व्यासाची अशनी आदळल्यामुळे डायनासोर नष्ट झाले होते. ५२ हजार वर्षांपूर्वी ६० मीटर लांबीचा २० लक्ष टन वजनाचा अशनी पाषाण भारतात लोणार येथे आदळला होता. त्यानंतर ७४८२ (१९९४ पीसी वन) हा लघुग्रह १८/१९ जानेवारी रोजी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असल्याची बातमी सर्वत्र पसरवली आहे. त्यात काहीही तथ्य नसून अनेक शास्त्रज्ञांच्या मते या लघुग्रहापासून पृथ्वीला काहीही धोका नाही. त्यामुळे लोकांनी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. १.१ किमी व्यासाचा हा लघुग्रह पृथ्वीपासून १९ लक्ष ८१ हजार ४६८ किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. हे अंतर - चंद्र यांच्यातील अंतराच्या साडेपाच पटीपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नसल्याचे देखील यावेळी सोमण म्हणाले. ७४८२ (१९९४ पीसीवन) या लघुग्रहाचा शोध ९ ऑगस्ट १९९४ रोजी रॅाबर्ट मॅकनॅाट यांनी स्लाइडिंग स्प्रिंग वेधशाळेतून लावला होता. हा लघुग्रह ५७२ दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. मात्र कधी- कधी तो पृथ्वीच्या जवळून जातो. १७ जानेवारी १९३३ रोजी तो पृथ्वीजवळून गेला होता. आता यानंतर १८ जानेवारी २१०५ रोजी तो पृथ्वीजवळून जाणार आहे. अशाप्रकारे पृथ्वीजवळून भ्रमण करणाऱ्या हजार लघुग्रहांचा तपशील शास्त्रज्ञांना मिळाला आहे. त्यामुळे एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार आहे, हे अगोदर समजल्यास त्याचा मार्ग बदलणे किंवा तो आदळण्यापूर्वीच त्याचे तुकडे करणे हे लवकरच शक्य होणार आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे किंवा चिंता करण्याचे काहीच कारण नाही. यावेळी हा लघुग्रह पृथ्वीपासून खूप दुरून जाणार असल्याने तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाही, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये. कोणतीही भीती बाळगू नये, असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GGs5pk

Comments

clue frame