ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर गमावलेली रक्कम परत मिळणे शक्य

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com @ShrikrishnakMT पुणे : ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर गमावलेले पैसे परत मिळविण्यासाठी पहिले काही तास हे ‘गोल्डन अवर’ समजले जातात. या ‘गोल्डन अवर’मध्ये नागरिकांनी ऑनलाइन फसवणुकीची माहिती दिल्यास त्याचा तातडीने छडा लावता येतो. त्यातून गेल्या अडीच वर्षांत तब्बल २२ कोटी ६० लाख रुपये नागरिकांना परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. ही बाब लक्षात घेऊन ऑनलाइन फसवणुकीची माहिती नागरिकांना तत्काळ देता यावी, यासाठी सायबर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र क्रमांक सुरू करण्यात येणार आहेत. वाचाः गेल्या काही वर्षांत पुणे शहरात नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डाची माहिती चोरून अथवा नागरिकांना विचारून फसवणूक केल्याचे सर्वाधिक गुन्हे शहरात घडत आहेत. याशिवाय लॉटरी, नोकरी, ऑनलाइन खरेदी, मॅट्रिमोनी साइट, सोशल मीडियावरील ओळखीतून, भेटवस्तूंच्या आमिषाने नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड होत आहे. काही व्यावसायिक कंपन्यांना बनावट ई-मेल पाठवून पैसे उकळले जात असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. दर वर्षी या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहेत. फसवणूक झालेल्या सर्व व्यक्ती सुशिक्षित असूनही सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडत आहेत. वाचाः ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांत सायबर चोरटे ‘वॉलेट’ किंवा बँकेच्या खात्यात पैसे मागवितात. नागरिकांनी पैसे पाठविल्यानंतर तत्काळ तेथून ते पैसे काढून घेतले जातात; अथवा दुसऱ्या खात्यावर वळविले जातात. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित व्यक्ती तत्काळ पोलिसांकडे आल्यास सायबर पोलिसांकडून संबंधित बँक किंवा ‘वॉलेट’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जातो. त्यांना फसवणुकीच्या प्रकाराबद्दल माहिती देऊन ती रक्कम त्या ठिकाणीच थांबवून ठेवण्यास सांगितली जाते. त्यामुळे सायबर चोरटे ते पैसे काढू शकत नाहीत. अशा प्रकारे ‘गोल्डन अवर’मध्ये पोलिसांशी संपर्क साधणाऱ्या नागरिकांचे २२ कोटी ६० लाख रुपये पोलिसांनी मिळवून दिले आहेत. हे यश लक्षात घेऊन ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या घटनेची माहिती नागरिकांना तत्काळ देता यावी, यासाठी सायबर पोलिस ठाण्यात लवकरच दोन स्वतंत्र क्रमांक सुरू करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या क्रमांकांवर संपर्क साधणाऱ्या नागरिकांकडून फसवणूक झालेल्या खात्याची माहिती घेऊन संबंधित बँक अथवा ‘वॉलेट’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जाईल आणि नागरिकांची रक्कम परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. वाचाः . ऑनलाइन फसवणूक झालेले नागरिक तक्रार देण्यासाठी वेळेत आल्यामुळे त्यांची चोरीला गेलेली रक्कम परत मिळवून देणे शक्य झाले आहे. नागरिकांची ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर त्यात गेलेले पैसे परत मिळविण्यासाठी पहिले काही तास खूप महत्त्वाचे असतात. ऑनलाइन फसवणूक झालेल्या खात्याची माहिती नागरिकांना तातडीने देता यावी म्हणून सायबर पोलिस ठाण्यात लवकरच दोन स्वतंत्र क्रमांक सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. - डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे ऑनलाइन फसवणुकीमध्ये परत मिळविलेली रक्कम वर्षे परत मिळविलेली रक्कम २०१९ ११ कोटी ३९ लाख २०२० नऊ कोटी ६० लाख २०२१ एक कोटी ६० लाख . कठोर उपाययोजनांची गरज ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर सेलने दिल्ली; तसेच उत्तरेतील काही राज्यांमध्ये छापे घालून नागरिकांची फसवणूक करणारी कॉल सेंटर्स उद्‌ध्वस्त केली होती. झारखंडसह इतर नक्षलग्रस्त भागांतून ऑनलाइन फसवणुकीचा ‘उद्योग’ कसा फोफावला आहे, हेही पुणे पोलिसांनी देशाला दाखवून दिले होते. सध्याच्या परिस्थितीत केवळ या गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्व दिले जात असल्याचे दिसत आहे. मात्र, अशा घटना मुळातच होऊ नयेत, यासाठी कसोशीने प्रयत्न होण्याची गरज आहे. आपल्या शहरातील नागरिकांच्या बँक अकाउंटवर घालण्यात येत असलेला ऑनलाइन दरोडा रोखण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. या ‘आयटी’नगरीत पोलिसांना त्यासाठी सर्वप्रकारचे सहकार्य यापूर्वीही मिळाले आहे आणि पुढेही मिळणार आहे. नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34wE6vZ

Comments

clue frame