कोल्हापूर - पश्चिम घाटमाथ्यावर सुमारे 490 औषधी वनस्पती आढळतात. त्यांतील 308 वनस्पती या स्थानिक आहेत. त्या केवळ सह्याद्री पर्वतरांगामध्ये आढळतात. अन्यत्र या वनस्पती आढळत नाहीत. संधिवात आणि कर्करोगासह अन्य रोगांवरील औषधीसाठी या वनस्पतींचा वापर होत असल्याने यांचे संवर्धन होण्याची गरज आहे. जंगली भागात आढळणाऱ्या या वनस्पती मुख्यतः स्थानिकांकडून भाजीसाठी वापरल्या जातात. याच्यामधील औषधी गुणधर्मांचा विचार करून या वनस्पतींच्या लागवडीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
सातारा जिल्ह्यातील ठोसेघर येथे भटकंतीदरम्यान संशोधकांना मोठी सोनकी (शास्त्रीय नाव -अडेनुन इंडिकम) व भ्रहमदंडी (शास्त्रीय नाव-लामप्राचिनियम मायक्रोसेफालम) या वनस्पतींची रस्त्याच्या कडेला स्थानिकांकडून विक्री होताना पाहायला मिळाली. साहजिकच याबाबत उत्सुकता वाढल्याने या वनस्पतींवर डॉ. विनोद शिंपले, डॉ. सुजाता पाटील, डॉ. राहुल माने, डॉ. प्रशांत अनभुले यांनी संशोधन केले. यातील घटकांचा अभ्यास करून शोधनिबंध प्रकाशित केला आहे. या सूर्यफुल कुळातील (ऍस्ट्रेसी ) या वनस्पती आहेत. भारतात सुमारे 900 ऍस्ट्रेसी कुळातील वनस्पती आढळतात. त्यातील सर्वाधिक वनस्पती या मुख्यतः पश्चिम घाटमाथ्यावर आढळतात.
कोठे आढळते ही वनस्पती ?
पश्चिम घाटमाथ्यावर महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील ठोसेघर परिसरात, तिलारी आणि गगनबाबडा जंगल परिसरात ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते.
औषधी उपयोग
अल्सर, कीटक चावल्यानंतर होणाऱ्या वेदना, डोकेदुखी यावर औषध म्हणून मोठी सोनकीचा वापर होतो. मोठी सोनकीची ताजी पाने भाजी म्हणून खाल्ली जाते, तर भ्रहमदंडी ही सुद्धा संधिवातेचा विकार, जखमांवर वेदनाशामक, तसेच त्वचेचे विकार, जळजळ यावर औषधी म्हणून वापरली जाते. जंतुनाशक म्हणूनही हिचा वापर होतो.
संशोधनात याचा झाला अभ्यास
संशोधनानंतर ही वनस्पती भाजी म्हणून खाण्यास योग्य आहे. रानभाजी म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो, असे संशोधनात आढळले. संशोधनात या वनस्पतीतील रासायनिक घटकांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये मोठी सोनकीमध्ये मिथेनॉल (3.35 मिलिग्रॅम प्रति ग्रॅम), इथेनॉल (2.86 मिलिग्रॅम प्रति ग्रॅम), ऍसिटोन (2.25 मिलिग्रॅम प्रति ग्रॅम), तर भ्रहमदंडीमध्ये मिथेनॉल (3.94 मिलिग्रॅम प्रति ग्रॅम), इथेनॉल (2.88 मिलिग्रॅम प्रति ग्रॅम), ऍसिटोन (2.28 मिलिग्रॅम प्रति ग्रॅम) यांचे असे प्रमाण आढळले.
टीबीसंदर्भात संशोधन
मोठी सोनकी व भ्रहमदंडी या दोन्ही वनस्पतींचे नमुने क्षयरोगावरील जीवाणूंच्या तपासणीसाठी बेळगाव येथील महाराष्ट्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स व रिसर्च सेंटर येथे पुढील तपासणीसाठी संशोधकांकडून पाठवण्यात आले होते. यामध्ये या दोन्ही वनस्पती क्षयरोगावर गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. या वनस्पतींचे औषधी गुणधर्म विचारात घेता यावर संशोधनाच्या अनेक संधी आहेत.
from News Story Feeds https://ift.tt/2TtoVib
Comments
Post a Comment