मोबाइल इंटरनेट व्यसनाने विद्यार्थ्यांवर होतो 'हा' परिणाम

नवी दिल्ली: मोबाइलचे वेड हल्ली सगळ्यांनाच लागले आहे. सोशल मीडिया, मोबाइल गेम, व्हिडिओ साइट्समुळे अनेकांना मोबाइल हातातून दूर गेल्यास बैचेन होण्यास सुरुवात होती. विद्यार्थ्यांनाही मोबाइलचे व्यसन लागत असून त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. मोबाइलचे व्यसन लागलेल्या विद्यार्थ्यांना एकटेपणाची भावना अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. जर्नल ऑफ कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंगमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. या अभ्यासात २८५ विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. हे विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत होते. या संशोधनात विद्यार्थ्यांचे डिजीटल तंत्रज्ञान वापर, एकटेपणा, अभ्यास आदीबाबतचे आकलन करण्यात आले होते. इंग्लंडमधील एका विद्यापीठाने हे संशोधन केले. ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेटचे व्यसन लागते. त्यांना अभ्यास करण्यास अवघड जाते. इंटरनेट वापराच्या सवयीमुळे त्यांना एकटेपणाची तीव्र जाणीव होत असते. त्यातून नैराश्य आल्यामुळे अभ्यासावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. इंटरनेटचे व्यसन आणि अभ्यास यांच्यात नकारात्मक संबंध असल्याचे या संशोधनात आढळून आले आहे. इंटरनेटच्या व्यसनामुळे विद्यार्थी पूर्ण क्षमतेने, एकाग्रतेने अभ्यास करू शकत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या निकालावर होत असल्याचे सहसंशोधक फिल रीड यांनी सांगितले. या संशोधनानुसार, ४० टक्के विद्यार्थी इंटरनेटचा वापर सोशल मीडियासाठी करत असून ३० टक्के विद्यार्थी माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करत आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aoEqP7

Comments

clue frame