गुगल पेद्वारे वीज बिल भरणे महाग; खात्यातून ९६ हजार गायब

नवी दिल्ली: ऑनलाइन पेमेंट अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुंबईतील एका व्यक्तीला गुगल पेद्वारे बिल भरणा करणं महागात पडलं आहे. गुगल पेद्वारे वीज बिल भरणा करताना ग्राहकाच्या खात्यातून ९६ हजार रुपये गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ट्रॅक इनच्या रिपोर्टनुसार, संबंधित ग्राहक गुगल डॉट कॉमवर कस्टमर केअर क्रमांकाचा शोध घेत होता. काही वेळानं त्याला क्रमांक मिळाला, मात्र तो बोगस होता. त्यावर कॉल केला असता व्यवहार अयशस्वी होणे ही सामान्य बाब आहे, असं समोरच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं. त्यानंतर एक टेक्स्ट मेसेज लिंक पाठवली आणि त्यावर क्लिक करण्यास सांगितले. ग्राहकानं लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याच्या खात्यातून ९६ हजार रुपये अन्य अनोळखी व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर झाले. त्याचे बँक खाते 'गुगल पे'सोबत जोडलेले होते. फसवणूक रोखण्यासाठी काय कराल? >> फसवणूक करणाऱ्या व्यक्ती चलाखीनं आपण कस्टमर केअर अधिकारी आहोत अशी बतावणी करतात. त्याच्या बोलण्याची पद्धत एखाद्या बँक कर्मचाऱ्यासारखी असते. कॉल उचलला आणि तुम्हाला संशय आला तर बँकिंगसंबंधी विविध प्रश्न विचारा. त्यामुळं त्याचा गोंधळ उडेल आणि फोन स्वतःहून बंद करीन. >> बोगस अधिकारी बँक कर्मचारी असल्याचे सिद्ध करण्यासाठी काही पडताळणीसारखे उदा. तुमची जन्मतारीख, नाव, मोबाइल क्रमांक मागतील. थोडा तरी संशय आला तर त्यांना तुमची माहिती देऊ नका. >> हे बोगस कस्टमर केअर अधिकारी तुमच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही दिलेल्या सूचनांवर अंमलबजावणी न केल्यास डेबिट-क्रेडिट किंवा मोबाइल बँकिंग सेवा ब्लॉक होऊ शकतात, असं सांगतात. ते होऊ नये म्हणून अनेक जण घाबरून या बोगस अधिकाऱ्यांना सर्व माहिती देतात. पण तसं करू नका. >> कुठलाही अॅप डाउनलोड करू नका. बोगस कॉल करून ग्राहकाच्या मोबाइल फोनमध्ये रिमोट डिव्हाइस कंट्रोल अॅप म्हणजेच एनीडेस्क डाउनलोड करण्याचा ठकसेनांचा प्रयत्न असतो. >> अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर बोगस अधिकारी ग्राहकाकडे अॅप कोडची मागणी करतात. कोड एका लॉग-इनसारखं काम करतात. या कोडद्वारे आपल्या फोनचा अॅक्सेस त्यांना मिळतो.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ob7uRB

Comments

clue frame