‘इलेक्ट्रोस्मॉग’च्या विळख्यात जीवसृष्टी

मिलिंद बेंबळकर matatechkatta@gmail.com ‘इलेक्ट्रोस्मॉग’ अथवा ‘नॉन आयोनायझिंग रेडिएशन’ अथवा ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड’ अथवा ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन’ अथवा ‘मायक्रोवेव्‍ह रेडिएशन’ हे या वातावरणात, कृत्रिमरित्या तयार केलेल्या (मनुष्य निर्मित) विद्युत चुंबकीय लहरीच आहेत. हे रेडिएशन दिसत नाही; त्याला वास येत नाही म्हणूनच ते जास्त धोकादायक आहे. ते शरिरातील पेशींना जाणवते आणि त्यांच्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. आज जगातील ७३० कोटी लोकांचे मोबाइल फोन चालू असतात. टॅब्‍लेटस, लॅपटॉप, ब्लूटूथ, वाय-फाय, मोबाइल टॉवर, वायरलेस उपकरणांमधून होणाऱ्या रेडिएशनने आज आपण पूर्णपणे वेढलो आहोत. प्रा. डेव्हिड कारपेंटर, अल्‍बानी स्‍कूल ऑफ पब्‍लिक हेल्‍थ, अमेरिका यांनी, ‘लॅन्सेट’ या मासिकात केलेल्या दाव्यानुसार गेल्या दशकात ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन’चे प्रमाण एक क्विंटिलॉनने (एकावर १८ शून्ये ) वाढले असून, ते जीवसृष्टीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे. खुद्द एटी अँड टी, स्प्रिंट, व्हेरिझोन, टी-मोबाइल या कंपन्यांनी इलेक्ट्रोस्मॉगला प्रदूषक (प्रदूषण घडवून आणणारा) असे जाहीर केले आहे. ‘इलेक्ट्रोस्मॉगमुळे जर शारीरिक हानी झाली, तर त्याच्या नुकसान भरपाईची जबाबदारी या कंपन्यांवर राहणार नाही,’ अशा प्रकारचे धोरण ‘एटी अँड टी’ने फेब्रुवारी २०१४मध्ये जाहीर केले. त्यानुसार १) प्रदूषक (पोल्युटंट) जे बाहेर टाकून दिल्यामुळे, ज्याचा फैलाव झाल्यामुळे, झिरपल्यामुळे, स्थलांतरित झाल्यामुळे, सोडून दिल्यामुळे, अथवा वाहून गेल्यामुळे जर कोणाचे नुकसान झाले तर त्यास नुकसान भरपाई मिळणार नाही . २) प्रदूषक याचा अर्थ, कोणताही घनरूपी, वायूरूपी अथवा हानीकारक औष्णिक दूषित पदार्थ (उदा. धूर, वाफ आणि काजळी), विषारी वायू , आम्लयुक्त आणि क्षारयुक्त रसायने, कृत्रिमरीत्या तयार होणारे विद्युत क्षेत्र, चुंबकीय क्षेत्र, विद्युत चुंबकीय क्षेत्र, ध्वनिलहरी, सूक्ष्म तरंग (मायक्रोवेव्ह्ज), आयोनायझिंग, नॉन आयोनायझिंग रेडिएशन आणि टाकून दिलेला अनावश्यक कचरा (असा कचरा, जो प्रक्रिया करून परत वापरता येईल. दुरुस्ती करून त्याचा पुनर्वापर करता येईल आणि ज्यामधून उपयुक्त पदार्थ परत मिळविता येतील.) याचाच आधार घेऊन १५ मार्च २०१५ला ‘लॉइड्स ऑफ लंडन’ आणि ‘स्विस रे’ या जगातील सर्वांत मोठ्या रिइन्शुरन्स कंपन्यांनी सुद्धा सेलफोन, सेल टॉवर्स, वाय- फाय, आणि तत्सम वायरलेस उपकरणांच्या रेडिएशनमुळे होणाऱ्या आजारपणांना इन्शुरन्सचे पैसे देण्यास नकार दिला आहे. (भारतामधील परिस्थिती मात्र प्रचंड गोंधळाची आहे. येथील कायदे मंडळांनी कायदे बनवून इलेक्ट्रोस्मॉगला प्रदूषक असे जाहीर करावे. आणि या प्रदूषकावर प्रदूषण नियंत्रण मंडळे, राष्ट्रिय हरित प्राधिकरणे यांच्यामार्फत कडकपणे नियंत्रण ठेवावे.) पृथ्वी आणि मानवाची फ्रिक्‍वेन्‍सी समान असून, ती विन्‍फ्रेड शूमन रेझोनन्‍स तत्त्वानुसार ७.८३ हर्ट‌्झ आहे. म्हणून लोकांना या नैसर्गिक फ्रिक्वेन्सीचा त्रास होत नाही. मात्र, सध्या वापरात असणारे मोबाइल फोन, मोबाइल टॉवरचे अँटेना,वाय-फाय यंत्रणा, घरामधील कॉर्डलेस फोन यांपासून होणाऱ्या रेडिएशनची फ्रिक्‍वेन्‍सी ७०० मेगाहर्ट‌्झ ते २.८ गिगाहर्ट‌्झ (एकावर ९ शून्ये) इतकी प्रचंड असते. या रेडिएशनचा वास येत नाही किंवा ते डोळ्यांना दिसत नाही. मात्र, त्याचे दुष्‍परिणाम मात्र जाणवत राहतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचे कारण समजत नाही. इलेक्ट्रोस्मॉगच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीवरील मानवजात, झाडे, वन्यप्राणी यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे. याचे मुख्य कारण, अशा प्रकारच्या नॉनआयोनायझेशन रेडिएशनला सामोरे कसे जायचे याचे भान शरीरातील सजीव पेशींना अजून आलेले नाही. जगातील सुमारे दहा टक्के मंडळी ‘इलेक्‍ट्रिकल हायपर सेन्‍सिव्‍हिटी’ने (ईएचएस) ग्रस्‍त आहेत. या आजाराची लक्षणे म्हणजे शरीरभर मुंग्या फिरत असल्याचा भास होणे, त्वचेला चावणारी आणि तीव्र झोंबणारी भावना होणे, त्वचेवर पुरळ उठणे, रोगप्रतिकार शक्‍ती खालावणे आणि शरीर विविध प्रकारच्या ॲलर्जीसाठी उत्तेजित होणे, सतत खाज सुटणे, वेदना होणे आणि सूज येणे आदी त्रास होतात. ‘टिनिटस’ या आजारात कानाविषयी विविध समस्या निर्माण होतात. कमी ऐकू येणे, विविध प्रकारचे काल्पनिक आवाज ऐकू येणे (वास्तविक हे आवाज मेंदू मध्ये निर्माण होत असतात!), शरीरातील मेलाटोनिनची पातळी कमी झाल्यामुळे झोप न य़ेणे, सतत अस्वस्थ वाटणे, कॅन्सर आणि नपुंसकतेच्या प्रमाणात वाढ होण्यामागे मायक्रोवेव्‍ह रेडिएशन हे एक महत्वाचे कारण आहे. ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ यांनी ३१ मे २०११रोजी मायक्रोवेव्‍ह रेडिएशनला ‘क्लास २ बी’ कॅन्सरकारक घोषित केले आहे. अमेरिकी सरकारने २० दशलक्ष डॉलर खर्च करून २० वर्षे संशोधन केलेल्या ‘नॅशनल टॉक्सिकॉलॉजी प्रोग्राम’मध्ये नमूद केलेले आहे, की ७००० उंदरांवर केलेल्या संशोधनात मेंदूचा कॅन्सर आणि हृदयाचा कॅन्सर आढळून आला आहे. शाळेतील मुलांमध्ये वाय-फायच्या संपर्कामुळे नाक गळणे, चक्कर येणे, नाकातून रक्त येणे आदी समस्या उद्भवतात. एकूणच या रेडिएशनमुळे शरीरातील सर्व अवयांवर दुष्परिणाम दिसायला लागतात. ज्या व्यक्‍तिंमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असते आणि तणाव अधिक असतो, ते विविध आजारांना लवकर बळी पडतात. इलेक्‍ट्रोस्‍मॉग रेडिएशनमुळे आजारपणांना बळी पडण्याचा दुसरा महत्वाचा निकष म्हणजे, या रेडिएशनच्या सहवासात ती व्यक्ती किती काळ आहे (जेवढा काळ अधिक तेवढी आजारपणाची शक्यता अधिक!), त्या रेडिएशनची तीव्रता किती आहे (जेवढी तीव्रता अधिक तेवढी आजारपणाची शक्यता अधिक ) आणि हे रेडिएशन किती अंतरावरून होत आहे. (जेवढे अंतर अधिक तेवढी रेडिएशनची तीव्रता कमी होते). आपले शरीर, हृदय, मेंदू, मज्जासंस्था हे पूर्णपणे विद्युत ऊर्जेवर चालते (आपले शरीर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन शोषून घेत असते तेंव्हा आपले शरीर धन विद्युत्भारित - Positively Charged झालेले असते. त्यामुळे आपल्या शरीरातील व्होल्टेज वाढते.) जेंव्हा रेडिएशनची पातळी वाढलेली असते, तेंव्हा साहजिकच आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात कारण आपले शरीर या रेडिएशनला एक स्ट्रेस फॅक्टर समजते आणि त्याप्रमाणे प्रतिसाद देते. बायोइलेक्ट्रोमॅग्नेटिक्स या विषयातील ४०पेक्षा जास्त देशांमधील, २५०पेक्षा जास्त तज्ञ आणि डॉक्टरांनी ‘युनायटेड नेशन्स’ला इलेक्ट्रोस्मॉगपासूनच्या धोक्याबाबत निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून अमेरिकेतील (National Aeronautics & Space Administration) आणि नौदलातील डॉक्‍टरांना मायक्रोवेव्‍ह सिकनेसविषयी पूर्णपणे कल्‍पना होती. त्यांना ऑक्‍युपेशनल डॉक्‍टर असे म्हणतात. ही युरोप, आमेरिकेत विकसित झालेली वैद्यक क्षेत्रातील स्वतंत्र शाखा आहे. या क्षेत्रातील डॉक्‍टर्स कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा अभ्यास करीत असतात. कर्मचारी करीत असलेल्या कामामुळे आणि काम करीत असलेल्या परिसरामुळे त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होत आहे, याचा अभ्यास हे डॉक्‍टर करीत असतात (वास्तविक पाहता भारतातसुध्दा ही शाखा सुरू होणे अतिशय गरजेचे आहे.) पाणबुडीत काम करणारे सैनिक, रडार आणि रेडिओ यंत्रणे वरील आणि त्याच्या संपर्कात असणारे सैनिक, यांच्या आरोग्यावर मायक्रोवेव्‍ह रेडिएशनमुळे काय परिणाम होतात याचे अतिशय बारकाईने निरीक्षण ऑक्‍युपेशनल डॉक्‍टर करीत असतात. आता तर संपूर्ण मानवजातच या मायक्रोवेव्‍ह रेडिएशनच्या प्रभावाखाली आलेली आहे. त्यासाठी २०१६ मध्ये ‘युरोपीयन ॲकेडमी फॉर एन्व्हायर्न्मेंटल मेडिसीन’ या डॉक्‍टरांच्या संघटनेने मायक्रोवेव्‍ह रेडिएशन (इलेक्‍ट्रोमॅग्‍नेटिक फ्रिक्‍वेन्‍सी च्या रेडिएशनमुळे) मुळे होणाऱ्या शारीरिक व्याधी, आजारपणे यावर उपचार करणेसाठी एक विस्तृत मार्गदर्शक यादी तयार केलेली आहे. त्यामध्ये या आजारपणास प्रतिबंध कसा करावा, आजाराचे निदान कसे करावे आणि त्यावर उपचार कसे करावेत यासंबंधी सविस्तर नोंदी केलेल्या आहेत. युरोपीयन ॲकेडमीने म्हटले आहे, की आम्ही केलेला अभ्यास, आमची अनुभवात्मक निरीक्षणे आणि पेशंटनी आरोग्यविषयी केलेल्या तक्रारी आणि मायक्रोवेव्‍ह रेडिएशनचा सरळ संबंध आहे. भारतामधील ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ ,नवी दिल्ली या केंद्र सरकारच्या सर्वोच्च वैद्यकीय संशोधन संस्थेनेही युरोपीयन ॲकेडमीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे गरजेचे आहे. ‘अमेरिकन डिसॲबिलिटी ॲक्‍ट’नेही ‘इलेक्‍ट्रिकल हायपर सेन्‍सिटिव्हिटी’ या आजारास मान्यता दिलेली आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YSD08z

Comments

clue frame