‘हायब्रिड’ची उपयोगिता

डॉ. विलास सपकाळ नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला ऱ्हास बघता जल, वायू, ऊर्जा आदी महत्त्वाच्या स्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन होते अतिशय गरजेचे आहे. या जाणिवेतून प्रगत संशोधन केले जात आहे. हायब्रिड (संकरित) तंत्रज्ञानाचा विकास ही या संशोधनप्रक्रियेचा सकारात्मक परिणाम आहे. हायब्रिड कार्यक्षम आहे. विशेष म्हणजे ते पर्यावरणपूरकही ठरते. या तंत्रज्ञानामुळे अमूल्य स्रोतांचे संरक्षण होते. बचत होते. भरीस भर गुणवत्तेत वाढ होते. औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रक्रियांची संख्या कमी असल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. तयार केलेली वस्तू बाजारपेठेतील स्पर्धेत टिकून राहते. वस्तूचे उत्पादन करण्याकरिता औद्योगिक क्षेत्रात विविध पद्धती व प्रक्रिया वापरल्या जातात. वस्तू रिअॅक्टरमध्ये तयार झाल्यानंतर त्याचे शुद्धीकरण व कॉन्सट्रेशन करण्यात येते. याकरिता विविध तंत्रज्ञान वापरण्यात येते. जसे फिल्टरेशन, डिस्टीलेशन, सेन्ट्रीफ्युगेशन, इव्हॅपोरेशन, एक्ट्रॅक्शन, आयन एक्स्चेंज, मेम्ब्रेन फिल्टरेशन वापरण्यात येते. या तंत्रज्ञानाद्वारे वस्तू आवश्यक गुणवतेच्या स्तरापर्यंत नेण्यात येते. तथापि, या विविध प्रक्रियांमध्ये वस्तूची घट होते. नुकसान होते. याचा परिणाम उत्पादनखर्च वाढण्यात होतो. बाजारपेठेतील स्पर्धेवर होतो. ते टाळण्यासाठी या विविध व अनेक प्रक्रियांवर उपाय म्हणून हायब्रिड तंत्रज्ञान विकसित होत आहे. दोन किंवा जास्त प्रक्रिया वेगवेगळ्या न करता हायब्रिड तंत्रज्ञान वापरून एकाच प्रक्रियेद्वारे वस्तूचे शुद्धीकरण करणे शक्य झाले आहे. यामुळे उपकरणावरील सर्व खर्च कमी होतो. प्रक्रियेवरील अनावर्ती खर्चही कमी होतो. हायब्रिड तंत्रज्ञानात आंतरविद्याशाखेतील तसेच ट्रान्सडिसिजिनरी संशोधनातून दोन किंवा जास्त तंत्रज्ञानांचे संयुक्तीकरण केले जाते. याद्वारे दोन्ही तंत्रज्ञानांचे उत्तम गुण एकत्रित करण्यात येतात. हायब्रिड तंत्रज्ञानाद्वारे विविध प्रक्रिया एकाच उपकरणात एकाच वेळी करता येतात. हायब्रिड तंत्रज्ञान नावीन्यपूर्ण असे नवसंशोधन आहे. आज या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विविध क्षेत्रांत केला जात आहे. हायब्रिड तंत्रज्ञानातून वायू व सौर ऊर्जेच्या वीजनिर्मिती शक्य झाली आहे. वीजनिर्मितीकरिता वायू आणि फ्युएल सेल यांचेही हायब्रिड होत आहे. वीज व डिझेलवर चालणारी हायब्रिड मोटार विकसित झाली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता जीवतंत्रज्ञान व मेम्बेन तंत्रज्ञान यांचे हायब्रिड तंत्रज्ञान उपयोगी ठरत आहे. नॅनो व बायो तंत्रज्ञानाचे हायब्रिड करून पिकांच्या नवीन जाती विकसित झाल्या आहेत. अशा अनेक क्षेत्रांत या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. आपल्या देशाच्या उत्पादनक्षेत्राचा विचार करता हायब्रिड सेपरेशन तंत्रज्ञान, थ्री-डी प्रिटिंग, हायब्रिड मॅन्युफक्चरिंग प्रोसेसमधील संशोधनास तसेच परिणामकारक वापरास खूप संधी आहेत. विविध विद्यापीठांच्या संशोधन प्रयोगशाळांच्या संयुक्त संशोधनातून विविध विद्याशाखेतील तंत्रज्ञ एकत्र आणून प्रगत असे हायब्रिड तंत्रज्ञान निर्माण केल्यास वीजनिर्मिती, उत्पादनक्षेत्र, कृषिक्षेत्र तसेच पर्यावरण संरक्षणात मोठा सकारात्मक बदल होऊ शकेल. सांडपाण्यावरील शुद्धीकरणाच्या पारंपरिक पद्धतीस नवीन मेम्ब्रेन तंत्रज्ञान जोडून तयार होत असलेल्या हायब्रिड तंत्रज्ञानापासून पाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर होण्यास मोठी मदत होत आहे. यामुळे पाणीटंचाईवर मात करता येऊ शकते. हायब्रिड तंत्रज्ञान पदार्थांची सुरक्षितता वाढविण्यास मदत करते. पदार्थांची गुणवत्ता व आयुर्मर्यादा उच्च होण्यास कारणीभूत ठरू शकते. शेतमालावरील प्रक्रियेदरम्यान हे तंत्रज्ञान उपयोगात आणले गेले तर शेतमालाची किंमत वाढू शकते. संशोधक व औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन हायब्रिड तंत्रज्ञान विकसित करायला हवे. भारतात तसे प्रयत्न होत आहे. हे तंत्रज्ञान विकसित होत आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात मोठी संधी आहेत.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Gm50uM

Comments

clue frame