नव्या कायद्यातून टीव्ही वाहिन्या, न्यूज पोर्टलना वगळण्याची सरकारकडे मागणी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली ‘नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातून पारंपरिक दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वृत्तविषयक वेबसाइटना वगळावे,’ अशी मागणी नॅशनल ब्रॉडकास्टर असोसिएशन (एनबीए) या टीव्ही वाहिन्यांच्या संघटनेने माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ‘आमच्यासाठी पुरेसे कायदे, मार्गदर्शक तत्त्वे, आचारसंहिता आहेत,’ याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे. वाचाः ‘माहिती तंत्रज्ञन कायदा २०२१मध्ये डिजिटल वृत्त माध्यमांचा विचार करण्यात आलेला नाही. असे असतानाही टीव्ही वाहिन्या आणि न्यूज पोर्टल यांना या कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे माहिती तंत्रज्ञान कायदा २०००मधील तरतुदींचे उल्लंघन आहे,’ अशा शब्दांत या पत्रात ‘एनबीए’ने चिंता व्यक्त केली आहे. ‘एनबीए’ ही आघाडीची राष्ट्रीय आणि प्रादेशिक खासगी टीव्ही वाहिन्या आणि वृत्तवाहिन्यांची संघटना आहे. ‘डिजिटल पोर्टलवरील नियमनाचे आम्ही स्वागत करतो; परंतु टीव्ही वाहिन्या आणि न्यूज पोर्टल यांना नव्या कायद्याच्या कक्षेत आणण्याची गरज नाही. आमच्यासाठी पुरेसे कायदे, मार्गदर्शक तत्त्वे, आचारसंहिता आहेत. एनबीएच्या सदस्य वाहिन्यांना नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टँडर्डस अथॉरिटीच्या नियम आणि बंधनांचेही पालन करावे लागते,’ असेही संघटनेने म्हटले आहे. वाचाः ‘नव्या माहिती तंत्रज्ञन कायद्यातील प्रशासकीय बंधनांमुळे छोट्या आणि मध्यम पारंपरिक वृत्त माध्यम संस्था कोलमडून जातील. या नियमांसाठी नेमाव्या लागणाऱ्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांमुळे वेतनभार वाढेल; शिवाय अस्तित्वातील नियमांचीच पुनरावृत्ती करावी लागेल,’ अशी भीतीही संघटनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारने स्पष्ट आणि नि:संदिग्धपणे नव्या कायद्यातून पारंपरिक टीव्ही वाहिन्या आणि न्यूज पोर्टलना वगळावे, अशी संघटनेची मागणी आहे. ‘अंमलबजावणी स्थगित करा’ नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका सध्या न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्यांचे निकाल लागेपर्यंत नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्याची अंमलबजावणी स्थगित करावी, अशीही विनंती ‘एनबीए’ने जावडेकर यांच्याकडे केली आहे. वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uvm4ok

Comments

clue frame