Aditya.Tanawade@timesgroup.com Tweet : @AdityaMT पुणे : हल्ली एक जीबीपर्यंतचा चित्रपट किंवा वेबसीरीजचा एखादा भाग मोबाइलमध्ये डाउनलोड करायचा असेल, तर साधारण दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो. पण फाइव्हजी आल्यानंतर ही गोष्ट काही सेकंदात शक्य होणार आहे. देशात सुरू होणाऱ्या फाइव्हजी नेटवर्कचा इंटरनेट स्पीड दहा जीबीपीएस (गिगाबाइट्स प्रति सेकंद) असेल, असा दावा टेलिकॉम तज्ज्ञांनी केला आहे. देशात येऊ घातलेल्या या नव्या तंत्रज्ञानामुळे मोबाइल इंटरनेटच्या सर्वच मानकांवर मोठा परिणाम होणार असून, वापरकर्त्यांच्या जीवनशैलीतही अनेक बदल होणार आहेत. सध्याच्या मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेटच्या नेटवर्कचा विचार केला, तर डाउनलोड स्पीड, अपलोड स्पीड, लॅटन्सी (एखादी फाइल डिव्हाइसपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ) या मानकांवर कनेक्टिव्हिटीची यशस्वीता ठरवली जाते. महाराष्ट्रासह देशात फोरजी नेटवर्क उपलब्ध असले, तरी सध्या या सर्व मानकांची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. यामुळेच नागरिकांना सातत्याने इंटरनेटचा वापर करताना व्हिडिओ, गेमिंग, व्हिडिओ कॉल, फाइल डाउनलोडिंग या संदर्भात अनेक अडथळे येतात. फाइव्हजी तंत्रज्ञान हे सर्व अडथळे दूर करून अधिकाधिक ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’च्या जवळ जाणार आहे. हे तंत्रज्ञाना विकसित झाल्यानंतर जगभरात कुठेही ‘रिअल टाइम’ संवाद साधणे शक्य होणार आहे. फाइव्हजी तंत्रज्ञानाचा मोबाइलच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने विचार केला, तर सध्याच्या तुलनेत जवळपास दहा ते बारा पटीने अधिक इंटरनेट स्पीड नागरिकांना उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे या पुढे एखादी फाइल डाउनलोड होताना होणारे ‘बफरिंग’ फाइव्हजीमध्ये होणार नाही. याशिवाय मोबाइल गेमिंगच्या क्षेत्रावरही फाइव्हजी तंत्रज्ञान मोठे बदल घडवून आणणार असून, अधिक मोठ्या क्षमतेचे गेमही सहजरीत्या मोबाइलवर चालू शकणार आहेत. माध्यमे आणि करमणुकीच्या क्षेत्रावरही फाइव्हजी तंत्रज्ञानाचा परिणाम होणार असून, फाइव्हजीसह मोबाइलमध्येच टीव्ही, ओटीटी आणि जगभरातील करमणुकीच्या साधनांचा वापर करता येणे शक्य होणार आहे. ‘फाइव्हजी’ म्हणजे काय? फाइव्हजी म्हणजे ‘फिफ्थ जनरेशन’ तंत्रज्ञान. ज्यामध्ये तंत्रज्ञानाच्या साह्याने मानवी जीवन अधिक सुकर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा भविष्यातील टप्पा म्हणजे माणसाची अनेक दैनंदिन कामे मशिनच्या साह्याने केली जातील. ज्यामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’ या दोन संकल्पनांचा वापर अधिक केला जाईल. मोबाइल इंटरनेटमध्ये होणारे बदल - इंटरनेटचा स्पीड दहा जीबीपीएस पर्यंत असेल. - लॅटन्सी(फाइल मोबाइलपर्यंत पोहोचण्याचा कालावधी) एक मिनी सेकंद. - मोठ्या क्षमतेचे गेम्स सहज चालू शकणार. - रिअल टाइमवर व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स शक्य. फाइव्हजी तंत्रज्ञानासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. टेलिकॉम कंपन्यांनी विविध परदेशी कंपन्यांची करार करून या तंत्रज्ञानाच्या चाचण्यांसंदर्भात काम केले आहे. देशभरातील आयआयटीमध्येही यावर काम सुरू आहे. लवकरच या चाचण्या सुरू केल्या जातील. या वर्षात नागरिकांना मोबाइल इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटी संदर्भात फाइव्हजी मुळे नक्कीच वेगळे अनुभव येतील. - डॉ. मिलिंद पांडे, टेलिकॉम तज्ज्ञ
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3phZLkg
Comments
Post a Comment