करवंद अन्‌ नेर्लीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहण्याची गरज

कोल्हापूर - सह्याद्री घाटमाथ्यावर करवंद आणि नेर्ली या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. करवंद हे झुडूप, तर नेर्ली ही वेलवर्गीय वनस्पती आहे. या दोन्हीही वनस्पतींवर फारसे संशोधन झालेले नाही. यामुळे या दुर्लक्षित वनस्पतींकडे लक्ष वेधले जावे, या उद्देशाने कोल्हापुरातील डॉ. राजाराम पाटील, संदीप पै, नीलेश पवार, विनोद शिंपले, राकेश पाटील, मानसिंगराज निंबाळकर यांनी या वनस्पतींच्या फळांमध्ये असणाऱ्या रासायनिक घटक आणि खनिजांच्या गुणधर्माचा अभ्यास केला. या संदर्भातील त्यांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे. 

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर करवंदाची करिसा करंदस तर नेर्लीची इलॅग्नस कन्फेर्टा या जाती आढळतात. तसे करवंदाच्या जाती सर्वत्र पाहायला मिळतात; पण नेर्लीच्या जाती सह्याद्री व्यतिरिक्त ईशान्य भारतात मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांत आढळतात. 

फळ आणि बियांतील घटक 

संशोधनात नेर्लीच्या फळामध्ये ऍसकॅर्बिक ऍसिड अर्थात व्हिटॅमिन "सी'चे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. नेर्लीच्या फळामध्ये व्हिटॅमिन "सी'चे 8.20 ते 8.30 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम इतके प्रमाण असते. या व्यतिरिक्त करवंद आणि नेर्लीच्या फळ आणि बियांमध्ये कॉपर, मॅंगेनिज, फेरस, झिंक, कॅल्शियम, क्रोमियम, कोबॉल्ट, मॅग्नेशियम ही आठ मूलद्रव्येही आढळतात. यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. 

प्रमुख मूलद्रव्यांचे प्रमाण असे (मिलीग्रॅम प्रतिकिलो) 

कॅल्शियम

नेर्ली फळ - 17.06 बिया - 28.60

करवंद फळ - 29.26 बिया -49.56 

मॅग्नेशियम

नेर्ली फळ - 1358  बिया - 140

करवंद फळ - 523 बिया - 407 

विष, रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता 

संशोधनामध्ये या दोन्ही फळांमध्ये रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता तसेच शरीरातील चयापचय क्रियेमध्ये तयार होणाऱ्या घातक घटकांचे विघटन करण्याची क्षमता (ऍन्टिऑक्‍सिडन्ट ऍक्‍टिव्हिटी) असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा औषधी गुणधर्मांचा सखोल अभ्यास करून तसेच या फळांचे महत्त्व विचारात घेऊन या वनस्पतींच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

व्यावसायिकदृष्ट्या लागवड गरजेची 

मुख्यतः घनदाट जंगलात आढळणाऱ्या या वनस्पतींकडे उत्पन्नाचा स्रोत या उद्देशाने कधी पाहिलेच गेले नाही. जंगलात आढळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड व्यावसायिकदृष्ट्या केली जात आहे. तशी करवंद व नेर्ली यांचीही लागवड करता येणे शक्‍य आहे. अन्य फळझाडांप्रमाणे यांचेही उत्पादन घेता येणे शक्‍य आहे; पण यावर अधिक संशोधन आपल्याकडे झालेले नाही. फक्त या फळांपासून जाम, जेली, वाईन, सरबत, लोणची इत्यादी उपपदार्थांचे उत्पादन घेता येऊ शकते, इतकेच प्रयोग झाले आहेत. तशी याची उत्पादनेही घेतली जात आहेत; पण त्याला मर्यादा आहेत. डोंगराळ भागात व्यावसायिक दृष्टिकोनातून यांच्या लागवडीच्या संदर्भात प्रयोग कोठे पाहायला मिळत नाही. डोंगरी लोकवस्तीतील घटकाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या लागवडीचा प्रयोग होणे गरजेचे आहे. यातून या डोंगरी लोकवस्तीचा विकास होऊ शकेल. त्यांचे जीवनमान उंचावणारा हा प्रयोग ठरू शकेल. 
 

 
 



from News Story Feeds https://ift.tt/2I8HyBW

Comments

clue frame