ट्विटरवर 'Edit'चा पर्याय कधीच मिळणार नाही; कंपनीचा खुलासा

नवी दिल्ली: ट्विटरवरून मेसेज करणार असाल तर थोडा धीर धरा. कोणताही मेसेज करताना तो मेसेज आता चार वेळा वाचा आणि मेसेज फायनल असेल तरच पोस्ट करा. कारण ट्विटरवर आता 'Edit'चा पर्याय कधीच मिळणार नाही. खुद्द ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनीच ट्विटरवर कधीच 'Edit'चा पर्याय देण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ट्विटरची ओरिजनल डिझाइन आणि ओळख कायम ठेवण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जॅक डॉर्सी यांनी गेल्या वर्षीच ट्विटरवर 'Edit'चा पर्याय देणार असल्याचं म्हटलं होतं. त्या फिचर्सवर काम सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना डॉर्सी यांनी पोस्ट करण्यात आलेल्या ट्विटसमध्ये बदल करण्यासाठी 'Edit'चा पर्याय देण्यात येणार नसल्याचं म्हटलं आहे. ट्विटरची सुरुवातच मुळी एसएमएस आणि टेक्सट मेसेज पाठवण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. एकदा तुम्ही एखादा मेसेज पाठवल्यानंतर त्यात कोणताही बदल केला जात नाही, हे सर्वांना माहीतच आहे, त्यामुळे आम्ही आमची ही ओळख जपण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं डॉर्सी म्हणाले. काही यूजर्स त्यांच्या ट्विट्सला प्रचंड लाइक्स मिळाल्यावर किंवा त्यांचं ट्विट प्रचंड शेअर झाल्यावर त्यात एडिट करून खोट्या गोष्टी पसरवू शकतात. त्यामुळे एडिचं फिचर्स दिल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. या सर्व गोष्टी विचारात घेता आम्ही कधीच एडिटचं फिचर्स देणार नाही, असं वाटतं, असंही त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरने ट्विटरवरून होणाऱ्या जगभरातील राजकीय जाहिरातींवर बंदी घातली आहे. राजकीय जाहिरात देणार नाही, असं डॉर्सी यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर कंपनीने अधिकृत रित्या ही बंदी घातली आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही पक्षाला ट्विटवर राजकीय जाहिरात देता येणार नाही.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Tynkbt

Comments

clue frame