नवी दिल्ली: डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यामातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हॅकर वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना गंडा घालत आहे. नोएडामध्ये राहणाऱ्या एका महिलेचे तब्बल दीड लाख रुपये हॅकर्सने लुटले. एका पीआर कंपनीत काम करणाऱ्या नेहा चंद्रा या पॅरिसला सुट्टीसाठी गेल्या होत्या. मेट्रोतील प्रवासादरम्यान त्यांची पर्स चोरीला गेली. पर्स चोरीला गेल्यानंतर अवघ्या काही वेळेतच त्यांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून दीड लाखाची रक्कम उडवण्यात आली होती. विशेष म्हणजे या दरम्यान नेहा यांना एकदाही ओटीपी क्रमांक आला नाही. हॅकर्सने तिच्या खात्यातून तीन वेळेस पैसे ट्रान्सफर केले. यामध्ये क्रेडिट कार्डमधून ५२, ४९९.९९ रुपये आणि डेबिट कार्डमधून ४४, ५४४.२४ रुपये ट्रान्सफर केले. हॅकर्सने चोरी केल्याचे समजल्यानंतर नेहाने त्वरीत बँकेच्या कस्टमर केअरसोबत संवाद साधून कार्ड ब्लॉक केले आणि खात्यात शिल्लक असलेली रक्कम तिने इतर खात्यात वळती केली. पॅरिसमधील पोलीस ठाण्यात याची तक्रार नोंदवली. म्हणून ओटीपी क्रमांक आला नाही साधारणपणे व्यवहार करताना ओटीपी क्रमांक येतो व त्यानंतर व्यवहार पूर्ण होतो. मात्र, या घटनेत ओटीपी क्रमांक आला नाही. याबाबत सायबर सुरक्षा तज्ञ राहुल त्यागी यांनी सांगितले की, भारतातील डेबिट कार्ड परदेशात वापरत असाल तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच्या रक्केच्या व्यवहारावर ओटीपीची आवश्यकता भासत नाही. हॅकर्सना ऑनलाइन पैसे चोरी करण्यासाठी फक्त कार्ड क्रमांक आणि सीव्हीव्ही क्रमांक द्यावा लागतो. एटीएममधून पैसे काढण्यासाठी हॅकर्सकडे बरेच पर्याय असतात. त्यात युजर्सच्या पिन क्रमांकही वापरू शकतात. अशी बाळगा सावधानता परदेशवारी करताना असा प्रसंग आपल्यावर येऊ नये यासाठी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. - तुम्हाला तुमचे डेबिट, क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवावे लागणार आहे. हे कार्ड चोरीला जाऊ नये याची काळजी घ्या - देशाबाहेर जाण्याआधी याची कल्पना तुमच्या बँकेला द्या. ओटीपीशिवाय होणाऱ्या रक्कमेची मर्यादा कमी करा. -अकाउंटमधून होणाऱ्या व्यवहारावर नजर ठेवा. काही गडबड वाटल्यास बँकेशी संपर्क करा.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3awtTRR
Comments
Post a Comment