सूर्यग्रहण सुरक्षितपणे कसे पाहावे?

मुंबई: आपण कंकणाकृती ग्रहणाच्या पट्ट्यात असलो किंवा खंडग्रास ग्रहण दिसणाऱ्या भागात; पाहण्यासाठी कायम सुरक्षित पद्धतींचाच वापर करावा लागतो. सूर्याकडून येणाऱ्या प्रखर आणि अतिनील किरणांमुळे (अल्ट्रा व्हायोलेट) डोळ्यांना कायमस्वरूपी इजा पोहोचू शकते. त्यामुळे सूर्याशी संबंधित आकाशात घडणारी कोणतीही घटना उघड्या डोळ्यांनी कधीच पाहू नये. कंकणाकृती अवस्थेत चंद्र पूर्णपणे सूर्यबिंबावर आला असताना आपल्याला सूर्यप्रकाश कमी झाल्याचे भासेल. मात्र, त्यावेळीही सूर्याकडून येणारे किरण डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. कंकणाकृती अवस्थेतही सूर्यग्रहण पाहण्यासाठी सुरक्षित पद्धतीचाच वापर करावा. अप्रत्यक्ष पद्धती - अप्रत्यक्ष पद्धतीने सूर्याचे निरीक्षण करताना सूर्याकडून येणारा प्रकाश थेट आपल्या डोळ्यात जात नाही. 'पिनहोल कॅमेरा' बनवणे अत्यंत सोपे असून त्यासाठी फक्त काळा कार्डशीट पेपर, फॉइल पेपर, ट्रेसिंग पेपर आणि फेविकॉल या साधनांची आवश्यकता असते. काळ्या कार्डशीट पेपरच्या नळीच्या एका बाजूला फॉइल पेपर, तर दुसऱ्या बाजूला ट्रेसिंग पेपर लावला जातो. फॉइल पेपरला पाडलेल्या छोट्याशा छिद्रातून सूर्याचा प्रकाश दुसऱ्या बाजूकडील ट्रेसिंग पेपरवर पडतो. ट्रेसिंग पेपरवर पडलेली सूर्याची उलटी प्रतिमा असते. - लहानसा टेलिस्कोप असल्यास टेलिस्कोपला कोणत्याही स्थितीत डोळा न लावता टेलिस्कोप सूर्याकडे रोखून धरावा. टेलिस्कोपच्या 'आयपीस'मधून येणारा सूर्याचा प्रकाश 'आयपीस'पासून थोडा दूर एका कागदावर घ्या. कागदावर सूर्याची प्रतिमा दिसून येईल. - एका मध्यम आकाराच्या प्लास्टिकच्या चेंडूवर लहानसा आरसा चिकटवा. त्यावर काळ्या रंगाचा कागद चिकटवून त्या कागदाचा गोलाकार भाग असा कापून काढा, ज्याने आरशाचा फक्त गोलाकार भाग खुला राहील. सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशाचे परावर्तन या चेंडूवर लावलेल्या आरश्याने दूर अंतरावर (३० ते ४० मीटर), मात्र सावली असेल अशा भिंतीवर घेतल्यास सूर्याची मोठी प्रतिमा दिसून येईल. वाचा: प्रत्यक्ष पद्धती - बाजारात मिळणारे 'सोलार एक्लिप्स गॉगल' सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित. आधी गॉगल डोळ्याला लावून मगच सूर्याकडे पाहावे आणि सूर्याकडून नजर हटवल्यावर मगच गॉगल डोळ्यावरून बाजूला करावा. ग्रहणाचा मध्य सुरू असेल, तरी गॉगल लावूनच सूर्यग्रहण बघावे. - बाजारात कमी दर्जाचे आणि असुरक्षित सोलार गॉगलही आले आहेत. ज्यामध्ये सोलार फिल्टर म्हणून साध्या ॲल्युमिनिअम फॉइलचा वापर करण्यात आला आहे. अशा 'फेक' गॉगलमुळे डोळ्यांना इजा पोहचू शकते. - गॉगलसाठी वापरण्यात आलेल्या फिल्मच्या विविध चाचण्यांचे रिपोर्ट पाहून मगच गॉगल खरेदी करावेत. गॉगलसाठी वापरण्यात येणारी सोलार फिल्म टेलिस्कोपला किंवा कॅमेराला लावण्यासाठीही उपलब्ध होते. - टेलिस्कोपद्वारे ग्रहण प्रत्यक्ष बघायचे असेल किंवा कॅमेराने फोटो काढायचे असतील, तर बाजारात मिळणारे सोलार फिल्टर टेलिस्कोप किंवा कॅमेराच्या पुढे लावूनच निरीक्षण करावे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZlsdWp

Comments

clue frame