भारतीयांनी शाओमीला बनवलं टॉप सेलिंग कंपनी

नवी दिल्ली : Huawei चीनच्या ग्राहकांमुळे जगातील सर्वाधिक स्मार्टफोन विकणाऱ्या कंपन्यांमध्ये आली असेल, तर शाओमीनेही आता भारतीय ग्राहकांचे आभार मानायला हवेत. हे आभार फक्त जगातल्या सर्वाधिक फोन विकणाऱ्या कंपन्यांमध्ये शाओमीचाही समावेश झाल्यामुळे नव्हे, भारतीय ग्राहकांनी एका फोनलाही टॉप सेलिंग बनवलं आहे. शाओमीचा टॉप कंपन्यांमध्ये समावेश तर झालाच आहे, पण सर्वात विशेष म्हणजे शाओमीच्या एका फोनचाही यादीत समावेश करण्यात आलाय. काऊंटरपॉईंटने २०१९ मधील तिसऱ्या तिमाहीत जगात सर्वाधिक विकल्या गेलेल्या स्मार्टफोनची रँकिंग जारी केली आहे. यामध्ये रेडमी ७ A नवव्या क्रमांकावर आहे. भारतीय ग्राहकांमुळे फोनने ही झेप घेतली. तिमाहीत एकूण विकल्या गेलेल्या फोनपैकी जवळपास निम्मे फोन फक्त भारतातच विकले गेले, असं या अहवालात म्हटलं आहे. काऊंटरपॉईंटच्या अहवालानुसार, शाओमीच्या या फोनला तिसऱ्या तिमाहीत चीनमध्येच थंड प्रतिसाद मिळाला. त्या तुलनेत भारतीय बाजारात मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. चीनच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये शाओमीला टक्कर देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यामुळेच चीनमध्ये शाओमी तीव्र स्पर्धेचा सामना करत आहे. रेडमी ७A हा भारतीय मार्केटमध्ये जोरदार प्रतिसाद मिळालेल्या रेडमी ६A या फोनचं सक्सेसर व्हर्जन आहे. यावर्षी जुलैमध्ये हा फोन लाँच झाला होता. ‘स्मार्ट देश का स्मार्टफोन’ या टॅगलाईनसह लाँच झालेल्या रेडमी ७A ची सुरुवातीची किंमत ५ हजार ९९९ रुपयांपासून पुढे होती. हा फोन सध्या ४ हजार ९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2EWdkAn

Comments

clue frame