तुम्हीही जीवनाचा साथीदार ऑनलाइन शोधताय?

नवी दिल्ली : सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वेगाने वाढत आहेत. आणखी एक असा प्रकार समोर आलाय, ज्यामुळे अनेकांची चिंता वाढणार आहे. सायबर गुन्हेगारांनी डेटिंग वेबसाइट्सनंतर आता ऑनलाइन मॅचमेकिंग वेबसाइटला लक्ष्य करणं सुरू केलं आहे. आपला जीवनाचा साथीदार मॅट्रिमनी साइट्सवर शोधणारांपैकी तुम्हीही असाल तर सावध राहण्याची आवश्यकता आहे. पुण्यातील एका इंजिनीअर तरुणीलाही मॅट्रिमनी साइटच्या माध्यमातून फसवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. मॅट्रिमोनियल साइटवर जीवनाचा साथीदार शोधताना तिचा सामना एका ठगाशी झाला आणि १० लाख रुपयांची फसवणूक झाली. मॅट्रिमनी साइट्सवर फसवणुकीचे प्रकार अत्यंत वेगाने वाढत असून तरुणींसह तरुणांचीही यावर फसवणूक होत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सायबर सुरक्षा विभागाच्या ट्विटर हँडलवरुन मॅट्रिमनी साइट युझर्ससाठी काही सूचना जारी केल्या आहेत. मॅट्रिमनी साइट्सवर काय करावं आणि काय करू नये याची माहिती यात देण्यात आली आहे. मॅट्रिमोनियल वेबसाइटवर नोंदणीसाठी नव्या मेल आयडीचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. सोबतच या ट्वीटमध्ये मॅट्रिमोनियल वेबसाइटवर फोटो, फोन नंबर आणि पत्ता यांसारखी वैयक्तिक माहिती शेअर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही मॅट्रिमनी वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करण्यापूर्वी ती वेबसाइट किती विश्वासार्ह आहे याची माहिती घ्या, असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं आहे. यासाठी युझर्स इंटरनेटवर उपलब्ध असलेले रिव्ह्यू वाचू शकतात. शिवाय आपले मित्र किंवा कुटुंबातील जाणकार सदस्यांचाही सल्ला घेऊ शकता. ज्या युझर्सना वेबसाइटच्या माध्यमातून जीवनाचा साथीदार मिळाला आहे अशा युझर्सला संपर्क साधल्यास आणखी विश्वासार्ह माहिती मिळेल. कशी होते फसवणूक? मॅट्रिमोनियल वेबसाइट्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीत मुलगा किंवा मुलगी गप्पांमध्ये गुंतवतात. चांगली ओळख होताच काहीही आपत्कालीन कारण दाखवून पैशांची मागणी केली जाते. फसवणुकीसाठी गिफ्टचंही कारण पुढे केलं जातं. भविष्यातील साथीदारासाठी गिफ्ट पाठवलं आहे, पण ते घेण्यासाठी अकाऊंटमध्ये ‘टॅक्स मनी’ ट्रान्सफर करण्याची मागणी केली जाते.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QtnSMG

Comments

clue frame