व्होडाफोन-आयडियाचे प्लान्स महागणार!

नवी दिल्ली : तुम्ही व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक असाल तर तुम्हाला १ डिसेंबरपासून टेरिफ प्लानसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीचे टेरिफ प्लान्स १ डिसेंबरपासून महाग होणार असल्याची माहिती व्होडाफोन-आयडिया लिमिटेडकडून (व्हीआयएल) देण्यात आली आहे. कंपनीला सातत्याने होत असलेलं नुकसान यामागचं कारण देण्यात आलं आहे. व्हीआयएलला एकाच तिमाहीत ५० हजार ९२२ कोटी रुपयांचा वित्तीय तोटा झाल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली होती. पूर्वप्रभावाने कर देण्याचा निर्णयही सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांवर आर्थिक संकट आलं आहे. याशिवाय एअरटेलही १ डिसेंबरपासून टेरिफ प्लान महाग करणार आहे. मोबाइल डेटा शुल्क जगाच्या तुलनेत भारतात सर्वात कमी आहे. वाढत्या स्पर्धेत ग्राहकांना कमीत कमी दरात डेटा उपलब्ध करुन दिला जात असल्याचं दूरसंचार कंपन्यांचं म्हणणं आहे. भारतीय दूरसंचार कंपन्यांचा सरासरी नफ्यावर वापर जगात सर्वात कमी आहे. व्हीआयएलचा सरासरी ग्राहक महसूल १०५ रुपये प्रति महिना आहे. एअरटेलकडूनही प्रति ग्राहक महसूल वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र कंपनीचा तोटा वाढतच चालला आहे. मोबाइल टेरिफ दर सध्या अस्थिर असून त्यात वाढ करण्याची गरज ऑक्टोबरमध्ये एअरटेलने बोलून दाखवली होती. त्यामुळेच तोटा कमी करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना दरवाढ करावं लागणं निश्चित झालं आहे. दूरसंचार कंपन्यांना १.३० लाख कोटी रुपये सरकारला द्यायचे आहेत. याविरोधात कंपन्या सुप्रीम कोर्टातही गेल्या. पण निर्णय हा सरकारच्याच बाजूने लागला. दरम्यान, सरकारने सचिवांची समिती नियुक्त केली असून या माध्यमातून या क्षेत्रातील तणाव आणि अस्थिरता दूर करण्यावर उपाय शोधले जाणार आहेत. दूरसंचार क्षेत्रात सध्या कंपन्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. सर्वात जास्त ग्राहक असलेल्या व्हीआयएलने तिमाही तोट्याच्या बाबतीत टाटा मोटर्सलाही मागे टाकलं आहे. व्हीआयएलला सप्टेंबर २०१९ तिमाहीत ५० हजार ९२२ कोटी रुपये तोटा सहन करावा लागला. कारण, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जी रक्कम द्यायची आहे, त्याचीही तरतूद करावी लागली.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37gJIe8

Comments

clue frame