पुन्हा 'मिशन चांद्रयान'; मोहिमेची जय्यत तयारी सुरू

नवी दिल्ली: चांद्रयान-२ला अपेक्षित यश न मिळाल्याने खचून न जाता इस्रोने पुन्हा एकदा चांद्रयान-३ची जय्यत तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबर २०२०पर्यंत ही मोहीम फक्ते करण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी कंबर कसली आहे. चांद्रयान-२च्या अपयशातून धडा घेऊन इस्रोने चांद्रयान-३साठी अनेक समित्या स्थापन केल्या आहेत. त्यातील तीन उपसमित्यांनी पॅनेलसोबत ऑक्टोबरमध्ये तीन उच्चस्तरीय बैठकाही केल्या आहेत. चांद्रयान-२ मोहिमेतील ऑर्बिटरचे कार्य व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे नव्या मोहिमेत फक्त लँडर आणि रोव्हरचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी संबंधी समितीची बैठक पार पडली. शास्त्रज्ञांच्या तीन उपसमित्यांनी प्रोप्लशन, सेन्सर्स, नॅव्हीगेशन आणि इंजिनिअरींगसंबंधी केलेल्या सूचनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. चांद्रयान-३ मोहिमेचं काम वेगानं सुरू आहे. इस्रोने आतापर्यंत लँडिंग साईट, दिशादर्शनासह १० महत्वाच्या गोष्टींकडे इस्रोने विशेष लक्ष दिले आहे, असं नासाच्या सूत्रांनी सांगितलं. मिशनमध्ये लँडरचे पाय भक्कम करण्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. जेणेकरुन वेगात लँडिंग झाले तरी लँडर सुस्थितीत राहिल. चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरने अपेक्षेपेक्षा जास्त वेगात लँडिंग केले. त्यामुळे लँडरचे नुकसान झाले होते. दरम्यान, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने () 'चांद्रयान-२' या भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'विक्रम लँडर'चे सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु 'विक्रम'चे सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नव्हते. 'विक्रम'शी संपर्क तुटल्यानंतर त्याबाबत अधिक माहितीही मिळाली नाही. त्या पार्श्वभूमीवर 'नासा'ने १४ ऑक्टोबर रोजी ऑर्बिटरद्वारे विक्रम लँडर उतरलेल्या भागातील छायाचित्रे घेतली होती; परंतु त्या छायाचित्रात लँडरचा कुठेही ठावठिकाणा दिसला नाही. 'लँडिंगच्या प्रयत्नापूर्वीचे आणि १४ ऑक्टोबर रोजीच्या छायाचित्राचे सूक्ष्म तौलनिक अभ्यास करण्यात आले. तरीही लँडर आढळले नाही,' असे 'नासा'चे प्रकल्प शास्त्रज्ञ नोह एडवर्ड यांनी स्पष्ट केले होते, तर 'आमच्या ऑर्बिटरने छायाचित्रे घेतली, तेव्हा लँडर एखाद्या गडद सावलीत लपला असावा किंवा ज्या भागात छायाचित्रे घेतली तिथे लँडर नसेल, अशीही शक्यता आहे,' असे शास्त्रज्ञ जॉन केलर यांनी म्हटले होते.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2qVP3qd

Comments

clue frame