जिओचा ग्राहकांना झटका, कॉलसाठी पैसे लागणार

नवी दिल्लीः दिवाळी निमित्त अनेक कंपन्यांनी ग्राहकांना खूश करण्यासाठी फेस्टिव्ह सीजन अंतर्गत अनेक 'ऑफर्स' देऊ केलेल्या असताना रिलायन्स जिओने मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता यापुढे आउटगोइंग कॉल करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. जिओच्या ग्राहकांनी अन्य दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या नेटवर्कवर व्हाईस कॉल केल्यास ग्राहकांना प्रति मिनिट ६ पैसे मोजावे लागणार आहे. आउटगोइंग ऑफ-नेट मोबाइल कॉलवर ६ पैसे प्रति मिनिट शुल्क ग्राहकांना द्यावे लागणार आहे. ट्रायने जारी केलेले सध्याचे रेग्युलेशनचे आययूसी संपेपर्यंत ग्राहकांना हे शुल्क द्यावे लागणार असल्याची माहिती जिओकडून देण्यात आली आहे. आम्ही ट्रायला सर्व डेटाची माहिती देणार आहोत. कारण आययूसी ग्राहकांच्या हिताची आहे, असे त्यांना समजले पाहिजे, असेही जिओने म्हटले आहे. इंटरकनेक्ट युजेज चार्ज याच्याशी हे प्रकरण जोडलेले आहे. आययूसी एक मोबाइल टेलिकॉम ऑपरेटर आहे. जे दुसऱ्याला दिली जाणारी रक्कम आहे. ज्यावेळी एक टेलिकॉम ऑपरेटरचे ग्राहक दुसऱ्या ऑपरेटरच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल करतात. त्यावेळी आययूसीची रक्कम कॉल करणाऱ्या ऑपरेटरला द्यावी लागते. दोन वेगवेगळ्या नेटवर्क दरम्यान कॉल मोबाइल ऑफ-नेट कॉलच्या रुपात ओळखली जाते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) कडून यासंबंधीचे शुल्क ठरवले जातात. सध्या याचे दर ६ पैसे प्रति मिनिट इतके आहे. नेटवर्कवर फ्री व्हाईस कॉलिंग तसेच २ जी नेटवर्क मिळत असल्याने दररोज ४० कोटी मिस्ड कॉल येत आहेत. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाचे ३५ ते ४० कोटी टूजी ग्राहक जिओला मिस्ड कॉल देतात. जिओ नेटवर्कवर दररोज २५ ते ३० कोटी मिस्ड कॉल येत असल्याची माहिती जिओने दिली आहे. अन्य कंपन्याच्या नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी जिओ १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतचा टॉप अप व्हाउचर जारी करणार आहे. १० रुपयांच्या प्लानमध्ये दुसऱ्या नंबरवर १२४ मिनिटे बोलता येऊ शकते. तर २० रुपयांच्या प्लानमध्ये २४९ मिनिटे, ५० रुपयांच्या प्लानमध्ये ६५६ मिनिटे आणि १०० रुपयांच्या प्लानमध्ये १ हजार ३६२ मिनिटे कॉलिंग केली जाऊ शकते. जिओने आपल्या ग्राहकांसाठी टॉप व्हाउचरच्या बदल्यात फ्री डेटा देण्याचे ठरवले आहे. १० रुपयांच्या प्लानवर १ जीबी डेटा, २० रुपयांच्या प्लानवर २ जीबी डेटा, ५० रुपयांच्या प्लानवर ५ जीबी डेटा, १०० रुपयांच्या प्लानवर १० जीबी डेटा दिला जाणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3110Obe

Comments

clue frame