मुंबई: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे गुरुवारी निकाल लागले. या निकालाचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांनी ट्विटरचा सर्वाधिक वापर केल्याचं आढळून आलं आहे. काल दिवसभरात ३२ लाख लोकांनी ट्विटरवरून या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचे अपडेट्स घेतले. राज्याचे मुख्यमंत्री , राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते हे ट्विटरवर हिट ठरले. या तिन्ही नेत्यांच्या अकाउंटला लाखो नेटकऱ्यांनी भेट दिल्याने काल दिवसभर ते ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये होते. विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहण्यासाठी काल अनेक नेटकऱ्यांनी विविध सोशल माध्यमांचा वापर केला. ट्विटरवरही अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांचे अकाउंट फॉलो करत निवडणुकीचे अपडेट्स जाणून घेतले. Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis), Aaditya Thackeray (@AUThackeray), Sharad Pawar (@PawarSpeaks) या ट्विटर हँडलवर जाऊन लोकांनी निवडणुकीची अपडेट्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मात देणाऱ्या महायुतीने ट्विटरवरही आघाडीला मागे टाकले होते. काल दिवसभरात शिवसेना-भाजपने ट्विटर हँडलवरून ३८ टक्के माहिती दिली तर काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या हँडलवरून ३३ टक्के माहिती दिली. ट्विटरवर काल दिवसभर विधानसभा निवडणुकीचे अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मुलाखत आणि प्रतिक्रियांचे व्हिडिओ अपलोड होत होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी एकमेकांच्या, राजकीय नेत्यांच्या आणि पक्षांच्या अकाउंटवर जाऊन माहिती घेतली. यावेळी नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही व्यक्त करताना राजकीय भाष्य करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, नेटकऱ्यांनी ट्विटरवरून ट्विट करताना #MaharashtraAssemblyPolls, #Maharashtra, #Election2019 and #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक हे हॅशटॅग सर्वाधिक वापरल्याचं आढळून आलं आहे. रिट्विट करतानाही नेटकऱ्यांनी याच हॅशटॅगचा वापर केला. मोदींचे ट्विट्स सर्वाधिक रिट्विट निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं जळगाव आणि साकोलीच्या रॅलीचं ट्विट सर्वाधिक रिट्विट करण्यात आलं आहे. त्या खालोखाल अभिनेता सलमान खानचा मतदान केलेला फोटोही सर्वाधिक रिट्विट झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजप- १०५ शिवसेना - ५६ राष्ट्रवादी काँग्रेस- ५४ काँग्रेस- ४४ बहुजन विकास आघाडी- ३ एमआयएम- २ समाजवादी पार्टी- २ प्रहार जनशक्ती पार्टी- २ माकप- १ जनसुराज्य शक्ती- १ क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १ महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १ राष्ट्रीय समाज पक्ष- १ स्वाभिमानी पक्ष- १ शेकाप - १ अपक्ष- १३ एकूण जागा- २८८
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2BKP6HU
Comments
Post a Comment