नवी दिल्ली: हुवैई कंपनीची सब ब्रॅण्ड कंपनी असलेली ऑनरने भारतात लाँच करत असलेला आपला पहिला स्मार्ट टीव्ही समोर आणला आहे. 'टीव्ही इंडिया मोबाइल काँग्रेस २०१९' मध्ये ऑनरने आपला स्मार्ट टीव्ही प्रदर्शित केला. ऑनर व्हिजन स्मार्ट टीव्हीचा प्रो वेरिएंट लाँच करण्याबाबत कंपनी विचार करत आहे. मोबाइल बाजारपेठेत कंपन्यांमध्ये सुरू असणारी स्पर्धा आता टीव्ही बाजारपेठेत दिसू लागली आहे. मागील काही महिन्यात अन्य मोबाइल कंपन्यादेखील टीव्ही बाजारपेठेत उतरल्या आहेत. ऑनरही आता भारतीय बाजारपेठेत उतरला आहे. चीनमध्ये मागील महिन्यात ऑनरच्या स्मार्ट टीव्हीची विक्री सुरू झाली आहे. चीनमध्ये हा टीव्ही ऑनर स्मार्ट या नावाने बाजारात उपलब्ध आहे. ऑनर व्हिजन स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये काय? टीव्ही मोबाइल काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या दोन्ही टीव्हीत ३डी आर्क डिझाइन आहे. टीव्हीचा अॅस्पेक्ट रेशो ९४ टक्के आहे. टीव्ही ५५ इंचाच्या स्क्रिनमध्ये उपलब्ध असून ४के रिझोल्यूशन (३८४०x२१६० पिक्सल)मध्ये उपलब्ध आहे. साउंडसाठी ऑनर व्हिजनमध्ये १० वॉटचे चार स्पीकर असून ऑनर व्हिजन प्रो मध्ये १० वॉटचे सहा स्पीकर आहेत. या टीव्हीमुळे प्रेक्षकांना चांगल्या साउंडचा अनुभव घेता येईल असा दावा कंपनीने केला आहे. ऑनर व्हिजन टीव्ही सीरीज Honghu 818 हा चिपसेटसह उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये दोन जीबीसह Mali-G51 GPU आणि ३२ जीबीची इंटर्नल मेमरी आहे. त्याशिवाय टीव्हीचा प्रोसेसर ६०एफपीएस वर ४के व्हिडिओला सपोर्ट करतो. त्याशिवाय टीव्हीमध्ये ६४ मेगापिक्सल इमेज डिकोडिंग, एचडीआर, नॉइज रिडक्शन आणि सुपर रिझोल्यूशन अपस्केलिंग सारखे फिचर्स आहेत. त्याशिवाय ब्लूटूथ, वायफाय, तीन एचडीएमआय पोर्ट, एक युएसबी पोर्ट आणि एक इथरनेट पोर्ट ही आहे. हा अॅण्ड्राइड टीव्ही नसून हुवैईच्या HarmonyOS ही ऑपरेटिंग सिस्टिम टीव्हीमध्ये आहे. किंमत आणि विक्री ऑनर व्हिजन स्मार्ट टीव्हीची विक्री पुढील वर्षी २०२०मधील पहिल्या तिमाहीत करण्यात येणार आहे. भारतात या टीव्हीची किंमत किती असेल याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. चीनमध्ये ऑनर व्हिजनची किंमत ३७९९ युआन (जवळपास ३८ हजार २०० रुपये) आणि व्हिजन प्रोची किंमत ४७९९ युआन (जवळपास ४८ हजार २०० रुपये) आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33uYQ4F
Comments
Post a Comment