टॉप टेन ब्रँडमधून फेसबुक आऊट, अॅप्पल अव्वल

सॅन फ्रॅन्सिस्को: फेसबुकच्या यूजर्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. प्रत्येकांच्या गळ्यातील ताईत असलेली सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकला जगातील टॉप टेन ब्रँडमध्ये स्थान मिळू शकलेलं नाही. प्रायव्हसीबाबतचा वाद आणि त्याच्या चौकशीमुळे कंपनीला झटका लागला असून टॉप ब्रँडच्या यादीत फेसबुकची १४ व्या स्थानी घसरण झाली आहे. ग्लोबल कन्स्ल्टन्सी इंटर ब्रँडने जगातील १०० बेस्ट ब्रँडची यादी जाहीर केली आहे. या यादीत अॅपलने पहिलं स्थान पटकावलं आहे. तर गुगलने दुसऱ्या आणि अॅमेझॉन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत मायक्रोसॉफ्ट चौथ्या स्थानावर आहे. कोका कोला पाचव्या, सॅमसंग सहाव्या, टोयोटा सातव्या, मर्सिडीज आठव्या, मॅकडोनाल्ड्स नवव्या आणि डिज्नी १० व्या स्थानावर आहे. फेसबुकबाबतचा वाद निर्माण झाल्यावर अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी सोशल नेटवर्किंग साइटला न्यू सिगारेटची उपमा दिली होती. सोशल नेटवर्किंग साइटचं मुलांना व्यसन लागत असून त्यासाठी कंपन्यांना जबाबदार धरलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं होतं. पोनेमॉन इन्स्टिट्यूटने २०१८मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार केंब्रिज अॅनालिटिका डेटा स्कँडलनंतर फेसबुकच्या विश्वासहार्यतेमध्ये ६६ टक्क्याने घट झाली होती. केवळ २८ टक्के यूजर्सनेच फेसबुकवर विश्वास दाखवला आहे. प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित होण्यापूर्वी हा आकडा ७९ टक्के एवढा होता. टॉप टेन ब्रँड >> अॅपल >> गुगल >> अॅमेझॉन >> मायक्रोसॉफ्ट >> कोका कोला >> सॅमसंग >> टोयोटा >> मर्सिडीज >> मॅकडोनाल्ड्स >> डिज्नी दरम्यान, प्रायव्हसी ब्रीच आणि केंब्रिज अॅनालिटिका स्कँडलच्या सेटलमेंटसाठी फेसबुकला ३४ हजार कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. फेसबुकनेही हा दंड भरण्यास होकार दर्शविला होता. केंब्रिज अॅनालिटिका या संस्थेने फेसबुकवरील यूजर्सचा डेटा चोरून त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघड झाला होता. तेव्हा फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग याने जाहीर माफीही मागितली होती. त्यानंतर काही हॅकर्सने फेसबुकच्या view as सेंटिगचा गैरवापर करून ३ कोटी युजर्सचा डेटा चोरला होता. यातील दीड कोटी युजर्सची नाव, पत्ता अशी प्राथमिक माहिती चोरीला गेली होती. तर १ कोटी चाळीस लाख यूजर्सची फेसबुक प्रोफाइलवरची बरीच गोपनीय माहितीही चोरीला गेली होती. या तीन कारणांमुळे दंड आकारला >> केंब्रिज अॅनालिटिका डाटा ब्रीच >> फेशियल रिकॉग्निशन बाय डिफॉल्ट ऑफ असल्याची खोटी माहिती दिली >> सिक्युरिटीसाठी यूजर्सकडून नंबर घेतले आणि त्यावर जाहिराती दिल्या


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MtJ18H

Comments

clue frame