iPhone XR भारीच! जगात सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली: एखाद्याच्या हाती आयफोन असला की, सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळतात आणि म्हणून सर्वसामान्यांना आकर्षित करणारा आणि खिशाला परवडेल असा आयफोन लाँच करण्याचं अॅपलनं ठरवलं आणि हाच निर्णय कंपनीच्या पथ्यावर पडला. जागतिक बाजारपेठेत सर्वाधिक विक्रीचा विक्रम या स्मार्टफोननं केला आहे. यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत जगभरात आयफोन एक्सआरचे तब्बल २६.९ मिलियन युनिट विकले गेले आहेत, अशी माहिती आयएचएस मार्केटच्या अहवालातून मिळाली आहे. अॅपलनं हा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केला होता. त्याच्यासोबत आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्स हे दोन स्मार्टफोनही लाँच केले होते. पण असं काय घडलं की अन्य आयफोनपेक्षा हा स्मार्टफोन सर्वाधिक विकला गेला. पहिल्याच तिमाहीत विक्रीचा उच्चांक गाठणाऱ्या या स्मार्टफोनच्या किंमती कंपनीनं कमी केल्या होत्या. लाँचिंगच्या वेळी आयफोन एक्सआरच्या ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ७६,९०० रुपये होती. तर १२८ जीबी व्हेरियंटची किंमत ८१, ९०० रुपये होती. २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ९१,९०० रुपये होती. अॅपलनं लाँचिंगच्या काही महिन्यांनंतर प्रमोशनल ऑफरसाठी फोनची किंमत कमी केली. ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटचा फोन ग्राहकांना ऑफरमध्ये फक्त ५३, ९०० रुपयांना मिळू लागला. १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये हा फोन ६४, ९०० रुपये, तर २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये हा फोन ७४,९०० रुपयांना मिळू लागला. त्यामुळं चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या फोनची सर्वाधिक विक्री झाली. रिपोर्टनुसार, पहिल्या तिमाहीत १३.६ मिलियन युनिट तर, दुसऱ्या तिमाहीत १३.३ मिलियन युनिटची विक्री झाली.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/319far5

Comments

clue frame