'विक्रम'शी पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न: इस्रो

नवी दिल्ली: विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला असला तरी इस्रोच्या शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास तुटला नाही. इस्रोकडून विक्रमसोबत पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रमुख यांनी दिली. डीडी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. चंद्रावर उतरण्यासाठी अवघे दोन किलोमीटरचे अंतर शिल्लक असताना विक्रमसोबतचा संपर्क तुटला होता. विक्रम चंद्रभूमीपासून २.१ किमी अंतरावर असताना इस्रो केंद्रासोबत त्याचा संपर्क सामान्य होता. मात्र, अचानक संपर्क तुटल्यामुळे मोहिमेला धक्का बसला. इस्रो प्रमुख के. सिवन यांनी सांगितले की, विक्रमसोबत पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चांद्रयान-२ मोहीम जवळपास ९५ टक्के यशस्वी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रयान-२ चा ऑर्बिटर जवळपास ७.५ वर्षापर्यंत कार्यरत राहू शकतो. त्याशिवाय गगनयानसह इस्रोच्या अन्य अंतराळ मोहिमादेखील वेळेतच पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनीदेखील चांद्रयान-२ मोहीम ९५ टक्के यशस्वी झाले असल्याचे म्हटले आहे. ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत असून त्याच्याकडून अधिक चांगले छायाचित्र मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. नासाचे शास्त्रज्ञ जेरी लिनेंगरनेदेखील भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. भारताची मोहीम साहसपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने कठीण बाब साध्य करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2N2gPeL

Comments

clue frame