चांद्रयान-२ची ऐतिहासिक कामगिरी पाहण्यासाठी उत्सुक: मोदी

नवी दिल्ली : चांद्रयान-२ चंद्रावर उतरण्यासाठी आता काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. या क्षणाची १३० कोटी भारतीय उत्सुकतेने वाट पाहत आहेत. भारतच नव्हे तर संपूर्ण जग वैज्ञानिकांचा हा आविष्कार पाहण्यासाठी उत्सुक आहेत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या इतिहासातील क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मी बेंगळुरूच्या इस्रोच्या केंद्रात आल्याने माझा उत्साह आणखा वाढला आहे. हा क्षण पाहण्यासाठी विविध राज्यातील तरुणही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच या ठिकाणी भूटानमधील काही तरुणही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी ट्विट करुन दिली आहे. मोदींसोबत या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शालेय विद्यार्थीही उपस्थित राहणार आहेत. इस्रोच्या ऑनलाइन प्रश्नमंजुषेत निवडले गेलेले काही विद्यार्थी माझ्यासोबत असणार आहेत. या प्रश्नमंजुषेत मोठया प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना अंतराळाविषयी असलेली आवड यातून अधोरेखित होते, असं त्यांनी म्हटलं आहे. मोहिमेच्या सुरुवातीपासूनच मी यावर लक्ष ठेवून आहे. २२ जुलै २०१९ रोजी मोहीम सुरू झाल्यापासून मी याबाबतची माहिती नेहमी घेत आहे. भारतीयांची प्रतिभा आणि त्यांचा दृढनिश्चय या मोहिमेतून अधोरेखित होतो. ही मोहीम यशस्वी झाल्यास या यशाचा कोट्यावधी भारतीयांना फायदा होणार असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. चांद्रयान-२ आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. काहीजणांनी याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करावेत. त्यापैकी काही मी रिट्विट करणार आहे, असंही मोदींनी सांगितलं. लँडर विक्रम प्रज्ञान रोवरच्या सहाय्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्री दीड ते अडीचच्या सुमारास अलगद उतरणार आहे. जर हे लँडिग यशस्वी झालं तर रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरणार आहे. पण चंद्राच्या दक्षिण धुव्राच्या संशोधनासाठी राबविलेली ही पहिलीच मोहीम असणार आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZNAml2

Comments

clue frame