'विक्रम' नॉट रिचेबल! आता लक्ष्य 'गगनयान'

बेंगळुरू: भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) सोडलेल्या 'चांद्रयान-२' मधील 'विक्रम' लँडरशी संपर्काची आशा पुरती मावळली आहे. 'इस्रो' प्रमुख के. सिवन यांनी अधिकृतरित्या तसं जाहीर केलं असून मिशन 'गगनयान'वर आम्ही आता लक्ष केंद्रीत केलं आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे. 'इस्रो'नं सोडलेल्या 'विक्रम' लँडरचं आयुष्य चंद्रावरील कालगणनेनुसार एका दिवसाचं (पृथ्वीवरील कालगणेनुसार १४ दिवसांचं) होतं. ७ सप्टेंबर रोजी चांद्रभूमीवर आदळलेल्या 'विक्रम'चा जीवनकाळ शनिवारी, म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी पूर्ण झाला. त्यामुळं 'विक्रम'शी संपर्क साधण्याच्या सर्व आशा आता मावळल्या आहेत, असं सिवन यांनी स्पष्ट केलं. आमचं प्राधान्य आता 'गगनयान'ला असेल, असं ते म्हणाले. ऑर्बिटर 'ऑन ड्युटी' 'विक्रम'चं काम संपलं असलं तरी चांद्रयान-२ मधील ऑर्बिटर उत्तम काम करत आहे. त्यातील सर्वच्या सर्व आठ उपकरणं सुरू आहेत. त्यांनी फोटो पाठवणं सुरू केलं असून संशोधक त्याचा अभ्यासही करत आहेत. ऑर्बिटरचा अपेक्षित कार्यकाळ एक वर्षांचा आहे. मात्र, त्यातील अतिरिक्त इंधनामुळं ते जवळजवळ सात वर्षे काम करू शकतो, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LFjPvr

Comments

clue frame