पाहावे पृथ्वीकडे

शहाजी मोरे ‘नासा’ या जगातील सर्वोत्तम अंतराळ संशोधन संस्थेने आता आकाशाऐवजी जमिनीशी नाते जोडून पृथ्वीवरचे दाहक प्रश्न सोडवावेत, असा विचार आता पुढे येतो आहे... पृथ्वीवरील एका मानवाने २० जुलै, १९६९ रोजी चंद्रावर पाऊल ठेवले, त्या घटनेला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवणे ही घटना अभूतपूर्व व मानव जातीने जल्लोष करण्यासारखीच! तसा जल्लोष झालाही व सध्याही अमेरिकेत अनेक कार्यक्रम होत आहेत. मानव जातीच्या इतिहासात प्रथमच पृथ्वीच्या बाहेर पडून एक माणूस अन्य खगोलीय पिंडावर उतरतो, या घटनेचे वर्णन कानात साठवावे, त्याची दृश्ये डोळ्यांत भरून ठेवावीत अशीच! पृथ्वीवरील मानवाने आकाशात ठेवलेले हे एक छोटेसे पाऊल मानव जातीसाठी एक उत्तुंग झेप ठरली आहेच; कारण त्यानंतर अनेक देशांनी आपले अवकाश कार्यक्रम राबविले. अमेरिकेने आपला अवकाश कार्यक्रम विस्तारला. १९७२पर्यंत अमेरिकेने सहा मानवी चांद्रमोहिमा राबविल्या. पुढे सोव्हिएत युनियनने अवकाशात एक स्थानकच (मीर) पाठविले. अमेरिकेने एक प्रयोगशाळा (स्काय लॅब) अवकाशात पाठविली. यासोबत अन्य मोहिमाही चालू होत्या. त्यातील ‘व्हॉएजर’ ही याने सूर्यमाला सोडून पलीकडे झेपावली आहेत. पृथ्वीवरील मानवाने पाठविलेली एक वस्तू सूर्यमालेच्याही बाहेर आपले अस्तित्व दाखविते, यासारखी दुसरे यश आहे का? पृथ्वीभोवती सध्या एक अवकाश स्थानक भ्रमण करत आहे. अनेक देशांच्या सहकार्याने ते शक्य झाले. त्यावर अनेक प्रयोग चालू आहेत. याशिवाय सूर्याकडे व बहुतेक सर्व ग्रहांवर उपग्रह सोडले आहेत. त्याचबरोबर काही अशनी, धूमकेतूंवरही उपग्रह पाठविण्यास मानव यशस्वी झाला आहे. याच वर्षी चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या बाजूवर चीनने आपला उपग्रह उतरविला व काही प्रयोगही केले. आतापर्यंत सुमारे १३५ मानवी व मानवरहित अवकाश मोहिमा राबविण्यात आल्या. चीनने चंद्रावर मानव उतरविण्याचा संकल्प सोडलाच आहे. आपणही तशी चांद्रमोहीम हाती घेणार आहे. आता पुन्हा २०२४ मध्ये मानवी चांद्रमोहीम राबविणार आहे. अमेरिका एक महिलादेखील चंद्रावर पाठविणार आहे. ज्या नासाने ५० वर्षांपूर्वी मानवास चंद्रावर पाठविले, तीच नासा ५० वर्षांनंतर परत तेच करणार असेल, तर त्यात विशेष व नावीन्य काय? अमेरिकेच्या प्यु रिसर्च सेंटरद्वारे केलेल्या पाहणीत ६३ टक्के लोकांनी पृथ्वीवरील हवामान बदलाविषयी घटकांच्या अभ्यासास व नियंत्रणास सर्वाधिक प्राधान्य दिले, १८ टक्के लोकांनी मंगळ मोहिमांना, तर केवळ १३ टक्के लोकांनी चांद्रमोहिमांना पसंती दिली. मुळात अमेरिका व तत्कालीन सोव्हिएत युनियनमधील शीतयुद्धाचा परिपाक म्हणजे अमेरिकेच्या मानवी चांद्रमोहिमा. साम्यवादी सोव्हिएत युनियन अंतरिक्ष मोहिमांमध्ये अमेरिकेच्या कितीतरी पुढे होती. पहिले अवकाशयान, पहिला अंतराळवीर, पहिली अंतराळवीरांगना सोव्हिएत युनियनचे. त्यामुळे अमेरिकेला भव्य दिव्य करून दाखविण्याची गरज होती आणि राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी घोषणा केली, की हे दशक संपण्यापूर्वी अमेरिकन माणूस चंद्रावर जाईल. त्याप्रमाणे घडले. त्यानंतर अमेरिकेतच मानवी चांद्रमोहिमांचे स्वारस्य कमी झाले. १९७२नंतर मानवी चांद्रमोहिमा राबविण्यात आल्या नाहीत. आता ट्रम्प पुन्हा चंद्रावर जायचे म्हणत आहेत. मानवी चांद्रमोहिमांमागे वैज्ञानिक अधिष्ठानापेक्षा अध्यक्षांचे मनसुबे महत्त्वाचे ठरले आहेत. आजपर्यंत नासाने अनेकदा देदीप्यमान कामगिरी केली. तेच तेच करण्याऐवजी आता नासाने पृथ्वीकडे लक्ष द्यावे, असा मतप्रवाह अमेरिकेत आहे. आजही जगात अनेक प्रश्न आहेत व ते अधिक गंभीर बनत आहेत. तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचे व एकंदरच सजीवसृष्टीचे जीवन संकटात सापडले आहे. शिवाय अनेक प्राण्यांच्या, वनस्पतींच्या प्रजाती नामशेष होत आहेत. प्रदूषण व वातावरणातील कर्बवायूने सर्वोच्च धोक्याची सीमा ओलांडली आहे. कोट्यवधी लोकांना पोट भरणे दुरापास्त होत आहे, तर अब्जावधी लोकांना पिण्यासाठी पुरेसे व शुद्ध पाणी दुर्लभ आहे. गारठ्यासाठी प्रसिद्ध असलेला युरोप उष्णतेने होरपळून निघत आहे. पर्यावरणीय संकटांमुळे स्थलांतराचा नवा प्रकार सुरू झाला आहे. नासा ही एक असामान्य संस्था आहे. ‘नासा’ने आपले तंत्रज्ञान, संशोधन व मनुष्यबळ पृथ्वीच्या भल्यासाठी वापरावे, असे मत आता व्यक्त केले जात आहे. तेच योग्य आहे; कारण पृथ्वीसारखे या विश्वात काहीही नाही व नसावे!


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YYEYEm

Comments

clue frame