पहिल्या महिला आमदार मुथुलक्ष्मी रेड्डी यांना गुगलची आदरांजली

मुंबईः पहिल्या महिला आमदार आणि पहिल्या महिला शल्यचिकित्सक हा बहुमान मिळवणाऱ्या यांची आज १३३वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डुडल साकारून त्यांना आदरांजली वाहिली आहे. तामिळनाडूमध्ये मुथुलक्ष्मी यांच्या जयंतीनिमित्त 'हॉस्पिटल डे' साजरा केला जातो. डॉ. रेड्डी यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य लोकांना उत्तम आरोग्य मिळावं आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यात खर्ची केलं. मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जन्म १८८६मध्ये तामिळनाडू येथे झाला. स्वांतत्रपूर्व काळात बालविवाह सारख्या प्रथांचा पगडा सर्वसामान्य नागरिकांवर अधिक होता. याच प्रथेमुळं डॉ. रेड्डींच्या आई-वडिलांनी त्यांचं लवकर लग्न करण्याचं ठरवलं. मात्र, त्यांनी लग्नाला विरोध करून शिक्षणाला प्राधान्य दिलं. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. तसंच, डॉ. रेड्डी सरकारी रुग्णालयात शल्यचिकित्सक म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. राजकारणात प्रवेश काही वर्षांनतर त्यांनी वैद्यकिय क्षेत्रातून निवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला. मद्रास विधानसभाच्या पहली महिला सदस्य म्हणून नियुक्त झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम लग्नासाठी मुलींचे वय वाढवण्यात यावे, यासाठी नियम बनवले. तसंच, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला. कर्करोग रुग्णालय उभारले डॉ. रेड्डी यांच्या बहिणीचा मृत्यू कर्करोगानं झाला. बहिणीच्या मृत्यूमुळं त्यांना जबर धक्का बसला. त्यानंतर १९५४मध्ये त्यांनी चेन्नईमध्ये एक कॅन्सर हॉस्पिटल उभारले. आजच्या घडीला डॉ. रेड्डींनी सुरू केलेल्या या हॉस्पिटलमध्ये दरवर्षी ८० हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले जातात. समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांना १९५६मध्ये भारत सरकारनं पद्म भूषण पूरस्काराने सन्मानित केलं. २२ जुलै १९६८ साली वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचं निधन झालं.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GDjdDP

Comments

clue frame